मुंबई-आज देशातील लाेकशाही, संविधान धाेक्यात आले आहे. आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी संविधानाचे रक्षण करायचे आहे. लाेकशाही वाचवायची आहे. देशात हुकुमशाही सुरू आहे. विकासासोबत स्वातंत्र्य पाहिजे. याचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि ही शपथ घेऊन पुढे जाणार आहोत, असे आग्रही प्रतिपादन शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू केलेली नाही. पहिल्या दोन बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या. मुंबईतील बैठकीत इथून पुढे सामूहिक कार्यक्रम काय असावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या शक्यतेवेळी असा निर्णय झाला तर काही लोकांवर ही जबाबदारी द्यावी लागेल. अन्य राजकीय घटक पक्षांशी संवाद साधून यातून आपण एकत्र जाऊ शकतो का यासंदर्भातील अभ्यास करण्याबाबत काही लोकांवर जबाबदारी सोपवावी लागेल, अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली
मुंबईत गुरुवार आणि शुक्रवार असे दाेन दिवस हाेणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार बाेलत हाेते. पत्रकार परिषदेला काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण, काॅंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थाेरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती हाेती.
उद्धव ठाकरे म्हणाले, की महिलांना राज्यात, देशात सुरक्षित वाटले पाहिजे. सरकार गॅसवर आहे. त्यामुळे सिलेंडरचे दर कमी केले. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. राज्य आणि केंद्र सरकार काय करत आहे. संकटात असताना मदत केली पाहिजे. येऊन फक्त भुलभुलय्या करून चालत नाही. पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत विचारणा केली. या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिले. ते म्हणाले, की इंडिया आघाडीच्या संयोजकासाठी आम्ही किमान समान कार्यक्रम करू शकतो. या आधारे संयोजक ठरवू. शरद पवार बोलत असतानाच उद्धव ठाकरे यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की पंतप्रधानांसाठी आमच्याकडे खूप पर्याय आहेत. पण, भाजपाकडे काय पर्याय आहे? गेल्या १० वर्षांत त्यांनी काय केले? सगळ्यांनी त्यांचा अनुभव घेतला आहे. कर्नाटकात पाहिले आपण, कोणतेच यश मिळाले नाही.
बजरंग बलीनेही त्यांना आशीर्वाद दिला नाही. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टोलेबाजी केली. ‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीपूर्वीच केंद्र सरकारने २०० रुपयांनी गॅस सिलिंडरचा दर कमी केला. ‘इंडिया’ जसा पुढे जाईल, तसे एक दिवस असा येईल, की केंद्र सरकार मोफत गॅस सिलेंडर देईल. मी पहिल्या बैठकीत सांगितले होते, की मी विरोधीपक्ष असा शब्द मानत नाही. आम्ही आमच्या देशाची रक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. भारतमातेचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हुकूमशहा आणि जुमलेबाजीला आमचा विरोधात तर आहेच. विविध विचारधारा असलेले देशभरातील पक्ष इंडिया आघाडीअंतर्गत एकत्र आले आहेत. एनडीए आणि पर्यायाने भाजपाला टफ फाईट देण्यासाठी इंडिया आघाडी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.